‘कोरोना’मुळं 6 महिन्यात 5 लाख एड्स रूग्णांचा होऊ शकतो मृत्यू : WHO स्टडी

जिनिव्हा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसं जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 2.97 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 43.45 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 4 महिन्यापासून सर्व देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही यश आलेले नाही. यासगळ्यात आता येत्या 6 महिन्यात तब्बल 5 लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आलं आहे. मात्र हे मृत्यू कोरोनामुळे नाही तर एड्समुळे होणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केलेल्या मॉडेलिंग अभ्यासानुसार आणि यूएनएड्सचा (UNAIDS) अंदाजावरून पुढील 6 महिन्यांत आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे 5 लाख लोकांचा मृत्यू होईल, असे झाल्यास 2008 मध्ये एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटेल.

2010 पासून आफ्रिकेत HIV संसर्गाचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले आहे. हे अँटीरेट्रोव्हायरल थेरपीमुळे घडलं आहे. मात्र, जर त्यांना योग्य वेळी औषध आणि थेरपी मिळाली नाही तर मोझांबिकमध्ये पुढील सहा महिन्यात 37 टक्के रुग्णांची संख्या वाढेल. मलावी आणि झिम्बाब्वेमध्ये 78-78 टक्के आणि युगांडाच्या 104 टक्के मुलांना HIV ची लागण होऊ शकते.

WHO आणि UNAIDS यांनी त्यांच्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, 2018 मध्ये 2.5 कोटी लोकांना HIV झाला होता. त्यापैकी 64 टक्के अँटीरेट्रोव्हायरस थेरपीच्या सहाय्याने बरे झाले. हा रिपोर्ट द टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर आरोग्य व्यवस्था खालावली आहे.