काँग्रेस अध्यक्षपदासाठी होऊ शकतो ‘या’ मराठी व्यक्तीचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीजनक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या राजीनामा देऊ केला होता मात्र काँग्रेस कार्यकारिणीने तो फेटाळला होता. पण तरीही राहुल गांधी राजीनामा देण्याच्या मन: स्थितीत आहेत. नवे अध्यक्ष येईपर्यंत ते पदावर असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गांधी घरण्याव्यतिरिक्त अध्यक्ष काँग्रेसला मिळेल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यातच सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थामुळे आता तेवढ्या सक्रिय नाहीत. त्यामुळेच नवे अध्यक्ष गांधी घराण्यातले नसतील, असा अंदाज आहे. आगामी काळात काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्ष असावेत या सूचनेला पक्षाच्या सदस्यांनी सहमती दर्शवली आहे. काँग्रेसच्या दोन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक दक्षिण भारतातला असेल तसेच येणारा कार्यकारी अध्यक्ष अनुसूचित जाती-जमातींमधला असावा, असाही एक प्रस्ताव आहे.

सुशीलकुमार शिंदे की मल्लिकार्जुन खरगे ?

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे अध्यक्षपदी मराठी व्यक्तीची निवड होईल अशी चर्चा तसेच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांसाठी नेत्यांपैकी सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांवर विचार सुरू आहे. त्याचबरोबर तरुण अध्यक्ष म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचंही नाव घेतलं जात आहे. नव्या अध्यक्षांची निवड संसदेच्या बजेट अधिवेशनापूर्वी होऊ शकते, अशी माहिती आहे.

राहुल गांधी सध्या वायनाड मध्ये मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले आहेत. पुढचे तीन दिवस ते वायनाडमध्येच राहणार आहेत. पण आता पुन्हा एकदा राहुल गांधींकडे अध्यक्षपद येणार नाही, असं बोललं जातंय. नव्या अध्यक्षपदाबद्दल गोंधळ असल्यामुळे पक्षामध्येही बेशिस्त वाढण्याचा धोका वर्तवला जात आहे.