सचिन वाझेंचा पाठलाग करणारी गाडी कुणाची ? प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणी विरोधकांनी सभागृहात आवाज उठविल्यानंतर सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. दरम्यान या प्रकरणात आता सचिन वाझे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक अज्ञात कार आपला पाठलाग करत असल्याचा दावा वाझे यांनी केला आहे. गाडीवर पोलीस असा उल्लेख असून गाडीच्या मागचा आणि पुढचा क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे ही गाडी कुणाची आणि ती वाझेंचा पाठलाग का करत होती, असे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी केली आहे. वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवल जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. अखेर या प्रकरणी सत्ताधारी महाविकास आघाडीला कफूटवर जावे लागले आहे. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली आहे.