अहमदाबादचे नाव कर्णावती का करत नाही ?, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा भाजपाला सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करणे औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरण झालं पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर राज्यात महाविकास आघाडी सरकार म्हणजे तिन्ही पक्ष सत्तेत आहे. औरंगाबादच्या नामकरणाबद्दलच राज्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. कारण, औरंगाबादच्या नामकरणाला आमचा विरोध राहिल, असे काँग्रेसने आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे, महाविकास आघाडीत नामांतरणावरुन बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या विषयाचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तरीही, भाजप नेत्यांकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजपा नेत्यांकडून सातत्याने संभाजीनगर नामांतरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. शिवसेनेचं संभाजीनगरबद्दल धोरण पाहिलं तर औरंगजेबाच्या वृत्तीची आठवण येते, ही शिवसेना नसून औरंगजेबची सेना आहे अशी बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यापद्धतीने बोलावले आणि जी वागणूक दिली, त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेची बोलायची भाषा एक आणि ज्या ज्या वेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा शिवसेना औरंगजेबाप्रमाणे वागते, त्यामुळे शिवसेनेला औरंगजेब सेना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्यक्ष नामांतरणावेळी शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे असं त्यांनी सांगितले. तर, दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपाकडे महापालिकेची सत्ता द्या, एका दिवसांत नामांतरणाचा ठराव करतो, असे म्हटले होते. त्यामुळे, याप्रकरणी राज्यात राजकारण चांगलच रंगल्याचं दिसत आहे.

भाजपच्या या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य करत संभाजीनगरच्या वादात उडी घेतली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. गुजरातमधील अहमदाबाद या शहराचे नाव कर्णावती ठेवण्याचा करार करण्यात आला होता. गुजरातमध्ये गेली कित्येक वर्षांपासून भाजपाचेच सरकार आहे, मग अद्यापही अहमदाबादचे कर्णावती असे नामांतरण का झाले नाही? असा सवाल आमदार मिटकरी यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांना चॅलेंज देत आमदार मिटकरी यांनी गुजरात आमच्याकडे द्या, आम्ही नाव बदलून दाखवतो, असं म्हटलंय. हवं तर तुमचं नाव देतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि रिपाइंनेही औरंगाबादच्या संभाजीकरण नामांतरणाला विरोध केला आहे. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबादऐवजी पुण्याला संभाजीनगर नाव द्या, अशी मागणी केली आहे.