पत्नी टोचून बोलली, पतिने गळा आवळून केला खून

मुरुम (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी टोचून बलते म्हणून पतिने तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर तो मृतदेहाजवळ झोपून राहिला. सकाळी उठून पतीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उमरगा तालुक्यातील मुरुम येथे घडला. आरोपी पतीने आज (शुक्रवार) पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सायंकाळी खूनाचा गुन्हा दखल करुन आरोपी पतीला अटक केली.

प्रियंका विनोद पवार असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून विनोद धनसिंग पवार याला अटक करण्यात आली आहे.
प्रियंका आणि विनोद यांचा नऊ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान, प्रियंका ही पाच महिन्याची गरोदर होती. विनोद हा मुरूम येथे बोअरवेल कमिशन एजंटचा व्यवसाय करीत होता. तर प्रियंका ही तुळजापूर येथे परिचारिका म्हणून नोकरी करीत होती. नुकतीच प्रियंकाची उमरगा येथे बदली झाली होती. मात्र, अद्याप त्या याठिकाणी रुजू झालेल्या नाही. त्यामुळे तुळजापूर येथून सध्या ती ये-जा करीत होती. बदलीवरुन प्रियंका व विनोद यांच्यात बुधवारीच किरकोळ वादावादी झालेली होती. गुरुवारी सकाळी तुळजापूर येथून ड्युटी संपवून प्रियंका मुरुमला परतली.

दरम्यान, गुरुवारी रात्री विनोद हा उशिरा घरी आला असता, पुन्हा वाद होवून विनोदने प्रियंका यांचा गळा आवळून खून केला. आज सकाळी स्वत: पोलिसांत हजर होवून त्याने घटनेची माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक डी. पी. सानप यांनी घटनास्थळी जाऊनन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याप्रकरणी मुरुम ठाण्यात आरोपी विनोद पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली पत्नी नेहमीच किरकोळ कारणावरून आपणास टोचून बोलते. त्यामुळे रागाच्या भरात आपण तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली विनोद पवार याने पोलिसांकडे दिली आहे