ड्रमवर माश्या घोंगावत असताना झाला ‘पर्दाफाश’, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ‘असं’ संपवलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करून हातपाय बांधून मृतदेह ड्रममध्ये टाकला. मृतदेह कुजल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरल्याने ही घटना उघडकीस आली. हा प्रकार शनिवारी (दि.19) पहाटे साडेपाचच्या सुमारास उघडकीस आला. घटनेनंतर फरार झालेल्या पतीला पोलिसांनी आज (शनिवार) दुपारी सिल्लोडमधून अटक केली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पंडित भिकाजी बिरारे (वय-50 रा. आरेफ कॉलनी, मूळ रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रत्ना बिरारे (वय-45) असे खून झालेल्या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरारे दांम्पत्य मागील 12 वर्षापासून आरेफ कॉलनीत रहात होते. दोन वर्षापासून ते शेख इसरार शेख हसन यांच्या बंगल्याच्या आवारातील खोलीत रहात. पंडित हा मोलमजूरी आणि रत्ना या शेख यांच्या बंगल्यात धुणीभांडी, साफसफाईचे काम करत होती. या दाम्पत्याला तीन विवाहित मुली आहेत.

गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांची मुलगी सृष्टी महेरी आली होती. तेव्हा पंडित हा पत्नीसोबत भांडण करत होता. मुलगी सृष्टी आणि तिच्या पतीने दोघांना समजावून सांगत भांड करु नका अशी विनंती केली. त्यानंतर ते घरी निघून गेले. त्यानंतर रात्री पंडितने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि हातपाय बांधून मृतदेह घराबाहेरील पाण्याच्या ड्रममध्ये टाकला. ड्रमला झाकण लावून आणि घराला कुलूप लावून पळून गेला.

बंगल्यामध्ये काम करण्यासाठी रत्ना आली नसल्याने शेख यांनी बिरारे यांच्या खोलीकडे जावून पाहिले तर खोलीला कुलूप होते. शनिवारी पहाटे ड्रमवर माश्या घोंगावत होत्या आणि दुर्गंधी येत असल्याने शेख यांनी ड्रमचे झाकण उघडले. त्यावळी त्यांना रत्नाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ बेगमपुरा पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामाकरुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

Visit : Policenama.com