पाठ दाखवून हल्ला करतो चीन, चालणार 1962 ची चाल ? जुन्या बातम्या ‘व्हायरल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन आपल्या युक्त्यासाठी ओळखला जातो. दोन महिन्यांच्या गतिरोधानंतर चीनने वास्तविक नियंत्रण रेषेवरून माघार घेतली आहे. चीनने आपले सैन्य बल, तंबू आणि तात्पुरती रचना देखील काढून टाकली आहे. पण चीन पुन्हा एकदा 1962 च्या युद्धाची पुनरावृत्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण एका इंग्रजी वृत्तपत्राचे कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या वृत्तपत्राच्या कात्रणामध्ये लिहिले आहे कि, Chinese Troops Withdraw from Galwan Post म्हणजेच चीनी सैन्याने गलवान पोस्टमधून माघार घेतली. वृत्तपत्राचे हे कात्रण 15 जुलै 1962 चे आहे. 1962 मध्येही गलवान खोऱ्यातूनच चीनने माघार घेतली होती, त्यांनतर त्याने पुन्हा तेथूनच युद्ध केले होते. यावेळी चीनने पुन्हा गलवान खोऱ्यातून माघार घेतली आहे.

1962 मध्ये गलवान पोस्ट भारतीय सैन्याच्या ताब्यात होते. तिथे गोरखा रेजिमेंटची छोटी तुकडी तैनात होती. जूनमध्ये चिनी सैन्याने त्याला घेराव घालण्यास सुरवात केली. भारताच्या दबावामुळे चीनला या पोस्टवरून माघार घ्यावी लागली. त्यानंतर 15 जुलै रोजी इंग्रजी वृत्तपत्रात अशीही एक बातमी आली की चिनी सैन्याने माघार घेतली आहे. काही तासांनंतर चीनी सैन्याने गलवान चौकीला घेराव घालण्यास सुरवात केली. यानंतर जाट रेजिमेंटची पलटण गलवान पोस्टला पाठविण्यात आली. 20 ऑक्टोबर 1962 रोजी चिनी सैन्याच्या सुमारे 2000 सैनिकांनी भारतीय चौकीवर हल्ला केला. सध्या भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवरून अंतर वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे सैनिकांमधील संघर्ष कमी होईल. दरम्यान, चीनच्या कोणत्याही चालीवर विश्वास ठेवता येणार नाही.

15 जुलै 1962 च्या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनी सैन्याने माघार घेतली होती, परंतु 96 दिवसानंतर 20 ऑक्टोबर रोजी चीनने भारतीय चौकीवर हल्ला केला. त्यानंतर भारत-चीन युद्ध झाले. यापूर्वी 10 जुलै 1962 रोजी चीनच्या 300 सैनिकांनी 1/8 गोरखा रेजिमेंटला घेराव घातला होता. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि चीन यांच्यात सामरिक आणि मुत्सद्दी चर्चा सुरूच राहिली. दरम्यान, नायक सुभेदार जंग बहादूर यांनी गोरखा रेजिमेंटच्या सैनिकांसह आपली पोस्ट ताब्यात घेतली. त्याच्या शौर्याच्या किस्से आजही ऐकायला मिळतात.

दरम्यान, गलवान खोऱ्यात ऑक्टोबरमध्येच पारा मायनसमध्ये जातो. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी गोरखा रेजिमेंटला हटवून 5 जाट अल्फा कंपनी मेजर एस एस हस्बनिस यांच्या कमांडमध्ये पाठविली. 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनी सैनिकांनी गलवान चौकी जाळली. त्याचबरोबर 36 भारतीय सैनिक शहीद झाले. मेजर हस्बनिस यांना ताब्यात घेण्यात आले. यातूनच भारत-चीनचे युद्ध सुरू झाले. मेजर हस्बनीस 7 महिने युद्ध कैदीसारखे राहिले. युद्ध संपल्यानंतर परत आले.