…तर देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल- रघुराम राजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ नंतर देशात जर कोणतेही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्तवला आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना रघुराम राजन यांचे वक्तव्य मोठं समजलं जात आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस (DAVOS) इथं सुरु असलेल्या जागतिक अर्थपरिषदेदरम्यान (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) ते बोलत होते.

देशात २०१९ च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि जर आघाडी किंवा युतीचं सरकार आलं, तर अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असं राजन यांनी यावेळी सांगितलं. त्यासोबतच जीएसटी, नोटबंदी आणि आरबीआयच्या स्वातंत्र्याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर अव्हनांबद्दलही त्यांनी यावेळी सांगितलं. भारतात उद्योगांना अनुकूल वातावरण असणे अतंत्य गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

२०१९मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास काँग्रेस रघुराम राजन यांना अर्थमंत्री करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर मी काही राजकारणी नाही, हे सर्व अंदाज आहेत, जे चुकीचे आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

दरम्यान, स्थिर सरकार असल्यामुळे निर्णय घेणं हे कोणत्याही सरकारला सोपं जातं. त्याउलट मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन केल्यास, निर्णयप्रक्रियेत विलंब होतो आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांनी आघाडी-युती ऐवजी एकहाती सत्ता असलेलं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कायम राहिलं, असा अंदाज वर्तवला.