‘महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार देवेंद्र फडणवीस करणार का ?’ : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या राज्याचे भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि भाजपप्रणित आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी फडणवीस मैदानात उतरणार आहेत. फडणवीसांच्या या भूमिकेवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांना एक सवाल केला आहे. तुम्ही गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकणावरून बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवरून सरकारवर टीका केली होती. तसंच मुंबई पोलीस दबावात काम करत असल्याचा आरोपही गुप्तेश्वर पांडे यांनी केला होता. याच पांडेंनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एकेरी उल्लेख करत तिच्याबद्दल पदाला न शोभणारं वक्तव्य केलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर गुप्तेश्वर पांडे हे अधिकाऱ्याऐवजी नेत्याची भाषा बोलत असल्याची टीका झाली होती. मात्र आता बिहार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाकडून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं भाजपप्रणित आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत.

गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस हे गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करणार का असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार देवेंद्र फडणवीस करणार का ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

यानंतर आता देवेंद्र फडणवीस त्यांची याबद्दल नेमकी काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.