विरोधकांकडून हल्लाबोल सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ‘महाविकास’नं घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सचिन वाझे प्रकरणामुळे भाजपने शिवसेनेला धारेवर धरले आहे. तर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे. परमबीर सिंगांच्या पत्राचा मुद्दा संसदेतही गाजला. या दोन्ही प्रकरणामुळे भाजप ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधकांकडून होत असलेले आरोप खोडून काढण्याची गरज असल्याची भूमिका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळे भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी आता महाविकास आघाडी सरसावण्याची शक्यता आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यामसोर त्यांची बाजू मांडली.

माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे असल्याचे देशमुखांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवली. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडतोय का? त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? अधिकारी फोन टॅप करणार असतील, तर मग मंत्र्यांनी काम कशी करायची? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.