Pune News : सोसायट्यांच्या सीमा भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देणार : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  दरवर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यासाठी भिंती बांधणे आवश्यक असून 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र खासगी सोसायट्यांच्या भिंती बांधणे शक्य नसल्याने पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या भिंतींबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाला पाठवावा, त्याचा पाठपुरावा केला जाईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी कोथरूड मतदार संघ आणि शहरातील विविध योजनांबाबत पालिका आयुक्तांसह विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पाटील म्हणाले, नाल्यातील गाळ काढण्याचा विषय जून अगोदरच संपवून टाकावा अन्यथा निम्मे पुणे पाण्याखाली जाईल. तसेच नाले सफाई करताना ठेकेदार गाळ काढतात की फक्त पैसे घेतात हे पाहण्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले. डीपी रस्त्यांचा विकास रखडला आहे. या रस्त्यांवर अतिक्रमणे आहेत. बधितांकडून जागेचा रोख मोबदला मागितला जातो. पालिकेकडून टीडीआर दिला जातो. बॉण्ड देण्याचा विचार असून हे बॉण्ड ट्रान्सफर करून नागरिकांना पैसे मिळू शकतात. या निर्णयाला वेळ लागत आहे. त्यावर मार्ग काढण्याच्या सूचना पाटील यांनी प्रशासनाला केल्या.

यावेळी पाटील यांनी समान पाणी पुरवठा योजनेची सद्यःस्थिती जाणून घेतली असून ही योजना पूर्ण होण्याची कालमर्यादा 2023 पर्यंत आहे. योजनेला वेळ लागत आहे. किमान एखाद्या विधानसभा मतदार संघात योजना पूर्ण करून कार्यान्वित करावी अशा सूचना दिल्या. प्रशासनाने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाटील म्हणाले. या योजनेबाबत लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करावी अशा सूचना यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांना केल्या. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संदीप खर्डेकर, राजेश पांडे आदी उपस्थित होते.