‘इकडे आड तिकडे विहिर’ अवस्था झालेले मुख्यमंत्री अजूनही गप्प का?’ भाजपची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे. ‘तो लादेन आहे का’ असे म्हणून पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री अजूनही गप्प का?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) केली जाणार आहे. त्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावरून आता भाजपकडून निशाणा साधला जात आहे. ‘सचिन वाझे यांचे प्रकरण बाहेर आले, तेव्हाच ते दिसते तितके साधे नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले होते. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झालेले मुख्यमंत्री ठाकरे आता तरी काही बोलणार काय…?

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलिस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री ‘हप्ता वसूली’ करताना पाहिले, अशी टीका केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.