भाजपा मंत्री उषा ठाकूर यांचे अजब विधान, म्हणाल्या – ‘मी हनुमान चालीसाचे पठण करते, शंख फुंकते म्हणून माझा कोरोनापासून बचाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मी दररोज हनुमान चालीसाचे पठण करते. रोज शंख फुंकते, काढा पिते. तसेच शेणाच्या गोव-यावर हवन करत असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोनापासून माझा बचाव होतो, असे अजब विधान मध्य प्रदेशातील भाजपच्या सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी केले आहे.

देशात वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र असे असतानाच मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक आमदार आणि मंत्री मास्क न लावताच दाखल झाले. यात सांस्कृतीक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी देखील विनामास्क विधानसभेत एन्ट्री केली. त्यावेळी त्यांना विचारले असता त्यांनी हे अजब उत्तर दिले आहे. तसेच मंत्री ठाकूर म्हणाल्या की, मी गळ्यात गमछा ठेवते. जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैलीचा अंगीकार करावा. त्यामुळे त्यांना कुठला आजार स्पर्शही करणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या.

तसेच यावेळी बसपाच्या आमदार रमाबाई परिहार याही मास्क न लावता विधानसभेत दाखल झाल्या. मास्क न लावल्याबद्दल जो काही दंड असेल तो मी भरेन. मास्क लावल्याने मला घाबरल्यासारखे होते, असे परिहार म्हणाल्या. लोक विनाकारण रस्त्यावर फिरतात त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचेही त्या म्हणाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.