बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला झटका; ‘कोरोनिल’ला महाराष्ट्रात परवानगी नाहीच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच काही लशींची निर्मितीही झाली आहे. त्यापैकी काही लशींच्या आपातकालीन वापरला केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. पण पतंजलीला राज्य सरकारने मोठा झटका दिला आहे.

कोरोनावरील औषध म्हणून पतंजलीने ‘कोरोनिल’ची निर्मिती केली. पण आता या औषधाच्या वापराला परवानगी मिळाली नाही. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून सांगितले, की जागतिक आरोग्य संघटना (WHO)आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिलच्या औषध विक्रीस महाराष्ट्र परवानगी दिली जाणार नाही.

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर IMA ने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लाँच केले औषध
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पतंजलीचे कोरोनिल औषध लाँच केले आहे. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्टीकरण मागितले होते. त्यामध्ये IMA ने सांगितले, की कोणताही डॉक्टर औषधे प्रमोट करू शकत नाही. मात्र, आरोग्यमंत्री जे स्वत: एक डॉक्टर आहेत, त्यांच्याद्वारे अशाप्रकारे औषधे प्रमोट केल्याने धक्का बसला आहे.