महिलांनी सामूहिक योगासने करून साजरा केला योग दिन

पोलीसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवार पेठ येथील रिव्हर व्ह्यू सोसायटीतील महिला सदस्यांनी सामाजिक अंतर राखत सामूहिक योगासने केली.

रविवारी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे अनेकांनी घरीच राहून योगासने केली. तर काहींनी सामाजिक अंतर राखत सामूहिक योगासने केली. शनिवार पेठेतील रिव्हर व्ह्यू सोसायटीतील महिलांनी सकाळी एक तास इमारतीच्या टेरेसवर सामाजिक अंतर राखत सामूहिक योगासने, प्राणायाम, ध्यान धारणा केली.

यावेळी महिलांनी सांगितले की, सोसायटीतील महिला दररोज सामूहिक योगाभ्यास करीत असतात परंतु आज आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याकारणाने उत्साह निराळा होता. योगासने, प्राणायाम, ध्यान धारणामुळे एक प्रकारची सकारात्मक उर्जा मिळते. मन शांत राहते. शारीरिक आणि मानसिक अनेक फायदे मिळतात. त्यामुळे सर्वांनीच दररोज योगासने, प्राणायाम, ध्यान धारणा केली पाहिजे. तरच निरोगी भारत हे स्वप्न साकार होवू शकेल.