सोलापूर : माकडाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सांगोला तालुक्यातील घेरडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून या भागात माकडाने धुमाकूळ घातला आहे. या भागात अनेकांचा चावा माकडाने घेतला होता. मात्र कृष्णाबाई सुतार या वृद्ध महिलेचा माकडाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे घेरडी ग्रामस्थांतून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे घेरडी येथील वयोवृद्ध महिला कृष्णाबाई सुतार यांचा बुधवार दिनांक २१ मार्च रोजी बळी घेतला. माकडाने त्यांचा चावा घेऊन लचका तोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रुग्‍णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना सांगोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तेथे कृष्णाबाई सुतार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या संबंधीची तक्रार सुतार यांच्या नातेवाईकांनी सांगोला पोलिसांकडे दिली आहे.

घेरडीत माकडाचा उच्छाद

घेरडी येथे जवळपास गेली तीन ते चार महिने गावात माकडाने उच्छाद मांडला आहे. गावातील अनेक जणांना या माकडाने चावा घेतला. तसेच गावातील अनेक महिला, विद्यार्थी तसेच इतरांनाही चावा घेऊन अथवा धक्का मारून तसेच हाताने बोचकारून गंभीररित्या जखमी केले. एवढेच नाही तर भाजी मंडईत देखील या माकडाने अनेकांना गंभीर जखमी केले आहे. उभ्या केलेल्या मोटरसायकल वगैरे पाडून त्यांचे नुकसान केले आहे. याबाबत घेरडी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, येथील विविध विद्यालय व संस्था यांनी वनविभागाला वेळोवेळी याबाबत कळविले आहे.

वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोकाट माकडाचा बंदोबस्‍त करण्‍याची मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे. गावांमध्ये एक पिंजरा आणून ठेवला आहे. वन विभागाने आता या माकडाला जेरबंद करण्यासाठी बाहेरून विशेष पथक मागवले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like