धक्कादायक ! नायलॉन मांज्यामुळं महिलेचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कामावरून सुटल्यानंतर सांयकाळी दुचाकीवरून घराकडे परतणा-या महिलेच्या गळ्याभोवती तुटून आलेल्या जीवघेणा नायललॉन मांजाचा फास पडला. त्यामुळे धारधार मांज्याने गळा चिरल्यांने त्यांचा मृत्यू झाला. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उड्डाणपुलावर सोमवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भारती मारुती जाधव (वय 46 रा. सिध्दीविनायक टाऊनशिप, साईनगर, अमृतधाम) असे गळा चिरून मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर एमआयडीसीत एका कंपनीतील काम संपवून सोमवारी सांयकाळी भारती जाधव घराकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. ट्रॅक्टर हाऊस येथे त्यांच्या गळ्याला तुटून आलेल्या नायलॉन मांजाचा फास पडला. धारदार मांजामुळे गळा चिरला गेला. यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या. साधारणत: दहा मिनिटे त्या तिथेच पडून होत्या. रक्तबंबाळ झालेल्या महिलेची अवस्था पाहून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान नातेवाईकांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनास्थळी तहसीलदारांनी धाव घेत नातेवाईकांशी संवाद साधत मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे जाधव यांच्या कुटुंबास मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.