महाराष्ट्र : आता वाघांच्या संरक्षणाला महिला ‘फौज’, शिकाऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – हल्लीच्या जमान्यात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा असो वा नवेगाव नागझिऱ्याचे मंगेझरी या अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्याची भीती त्या कदापि बाळगत नाहीत. प्राजक्ता उमरे, वर्षा जगताप, कांचन गजभिये, साधना निकुरे, प्रणिता आणि त्यांच्या सहकारी वने आणि वन्यजीवांवर वक्रदृष्टी टाकणाºया प्रवृत्तींविरुद्ध संपूर्ण ताकदीने लढा देत आहेत. शिकारी कधीही येऊ शकतो. त्यामुळे घनदाट जंगलात हिंस्त्र श्वापदांच्या सानिध्यात निडरपणे, जीव धोक्यात घालत त्यांची वाटचाल सुरू आहे. एकाच ध्येयाच्या दिशेने… देशाची वनसंपत्ती आणि वाघांचे रक्षण. या ठिकाणी कार्यरत असलेल्या या रणरागिणी आपले कर्तव्य निष्टेने पार पाडत आहेत.

याविषयी माहिती देताना नवेगाव नागझिरा एसटीपीएफच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नांगरे यांनी सांगितले कि, पहाटे तीन वाजतापासून ‘शिफ्ट’ असतात. ८ तास १० ते १५ किमीचा पल्ला पायी गाठावा लागतो.गस्तीदरम्यान प्रत्येक क्षण सतर्क राहून अवैध घटनांचा मागोवा घेणे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत त्यांच्या नोंदी करण्याचे काम करावे लागते. त्याचबरोबर गावातील पोलीस पाटलांची भेट घेणे. लोकांना वन्यजीवांचे महत्व पटवून देऊन गुप्त पद्धतीने तपास करावा लागत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात ४ विशेष व्याघ्र संरक्षण दल आहेत. प्रत्येक दलात किमान २६ वनरक्षक व ७ वननिरीक्षक महिला आहेत. सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी या जबाबदाऱ्या महिला पार पाडत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तैनात असलेल्या महिला कर्मचारी आणि अधिकारी यांनी विशेष मोहिमा देखील पार पाडल्या आहेत. यामध्ये पेंचमधील मासेमारीचा प्रश्न, ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्षविरोधी मोहीम, बचाव पथके, विजेद्वारे वन्यजीवांच्या शिकारीविरोधातील कारवाईत या वनवाघिणी आघाडीवर असतात.

कठोर प्रशिक्षण
या ठिकाणी विशेष व्याघ्र संरक्षण दलात सहभागी होताना अनेक महत्वाचे टप्पे पार पाडावे लागते. या पदासाठी निवड झाल्यानंतर सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण असते. अनुशासन, संघटन, शारीरिक क्षमता सिद्ध करण्यास व्यायामाशिवाय वेपन ट्रेनिंग, साइट सिक्युरिटी टायगर मॉनिटरिंगअशा विविध टप्प्यांमध्ये तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.