नांदेड : शेतकामाला येत नाही म्हणून तरुणाला मारहाण, 9 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

बिलोली : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीच्या कामाला का येत नाहीस ? असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना नायगाव तालुक्यातील होटाळा येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी येथे गणेश कोत्तेवार यांना 30 नोव्हेंबर रोजी अडवून नऊ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. तू आमच्या शेतामध्ये कामाला येत का नाहीस ? गावात गाडी घेवून फिरतोस ? तसेच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करता का ? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच काठीने व दगडाने बेदम मारहाण केली. मारहाण सुरु असताना गणेश यांच्या आईलाही त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले असून गणेश कोत्तेवार यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गणेश कोत्तेवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत माधव दिगांबर पवार, संदीप दत्तात्रय पवार, योगशे दादाराव पवार, योगेश वसंत पवार, बाळू देवराव पवार, माधव दिगांबर उमरेकर, मोहन तुकाराम पवार, दिगंबर राहुल पवार, गणेश व्यंकटराव पवार यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत गणेश कोत्तेवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढली उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.