पोस्टल मतदानासाठी तुरूंगात फेरफटका मारून बैठक घ्यावी लागेल

पंकजा मुंडेंची राष्ट्रवादीवर टीका

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – माझी बहिण डॉक्टर असल्यामुळे विरोधकांनी डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकित प्रीतम मुंडेंना पाडा असे आवाहन केले. आता आम्हालाही असे आवाहन करायचे असल्यास थेट तुरूंगातच फेरफटका मारून बैठक घ्यावी लागेल आणि पोस्ट मतदानासाठी आवाहन करावे लागेल अशी चपराक पंकजा मुंडे यांनी लगावली. आडस येथील सभेत त्या बोलत होत्या.

जातीयवाद वाढवून जातीसाठी माती आपल्याला खायला लावायची आणि विकास मात्र बारामतीचा करायचा हे षडयंत्र आता चालणार नाही. जनता आता सूज्ञ झाली असून यावेळी घृणास्पद डावपेच उधळून लावत ती खंबीरपणे प्रीतम यांच्या सोबत आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विकास होत असताना विरोधकांना मुद्दे शिल्लक नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीपातीचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमच्याकडून सुरेश धस हे मराठा उमेदवार होते. तर राष्ट्रवादीकडून रमेश कराड या वंजारी समाजातील व्यक्तीस उमेदवारी देण्याचा घाट घातला होता. त्यावेळी त्यांना जात आठवली नाही का ? ज्यांनी आपल्या स्वत:च्या घरातील व्यक्तींना धोके दिले त्यांची जात कोणती होती ? असा परखड सवाल पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला.