दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने २० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने रिसोड तालुक्यातील मांडव्या येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. ७ वर्षांपुर्वी त्याच्या वडीलांनीही आत्महत्या केली होती. अमोल भीमराव राठोड (वय. २०) असे त्याचे नाव आहे.

अमोल राठोडच्या आईच्या नावे २ एकर शेती आहे. तो गुरुवारी रिसोडच्या बँकेत दुष्काळ निधीचे पैसे जमा झाले का ते पाहण्यासाठी गेला होता. परंतु खात्यात पैसे जमा न झाल्याने घरी परतला आणि घरी परतल्यावर त्याने आधार कार्ड व बँकेचे पासबुक जाळले. त्यानंतर रात्री ९च्या सुमारास तो शेताकडे गेला. दरम्यान शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

शेतीच्या समस्या, कर्ज, नापिकीच्या संकटातून शेतकरी अद्याप बाहेर निघालेला नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. शेतकरी दुष्काळ आणि नापिकीमुळेही व्यथित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.