दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू

तुमसर (भंडारा) : पोलीसनामा ऑनलाईन-नव्या कोऱ्या गाडीवरुन कामानिमीत्त जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज तुमसर-देव्हाडी मार्गावरील फादर अॅग्नेल शाळेसमोर घडला. सुरेश देशमुख (वय-२४ रा. तुकडा देव्हाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवीशंकर एंचिलवार (वय-२५) हा गंभीर जखमी झाला आहे.

सुरेश देशमुख सकाळी ९ च्या सुमारास खासगी कामानिमित्त तुमसर येथे नव्या कोऱ्या दुचाकीने जात होते. विरुद्ध दिशेने रवी एंचिलवार दुचाकी क्रमांक एम.एच. ३६ डब्लू००६९ देव्हाडीकडे येत होता. फादर अग्नेल शाळेसमोर समोरासमोर दुचाकींची धडक झाली. यात सुरेश देशमुख यांची दुचाकी सुमारे २० ते २२ फुट फरफटत गेली. डोक्याला गंभीर इजा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. पायाचे हाड मोडले. रक्ताच्या थारोळ्यात सुरेश यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

रवी एंचिलवार हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुरेश देशमुख व त्याच्या भावाने देव्हाडी येथे दुचाकी दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. एक नामवंत मेकॅनिक म्हणून त्याची ओळख होती. या घटनेने देव्हाडी व तुडका गावावर शोककळा पसरली.