पोलिसांवर गंभीर आरोप करत तरुणाची आत्महत्या ; पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीन व्यवहारात तक्रार घेतली नसल्याचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून एका तरुणाने गळफास घेतल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

स्वप्नील दशरथ सपकाळ (वय ३३, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे. सपकाळ याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात त्याने प्लॉट देणारा, हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्यावर आरोप करुन त्यांना सोडू नका असे या चिठ्ठीत म्हटले आहे. दरम्यान, या चिठ्ठीत त्याने पत्नी गौरी व मुलगी गौरीला पण माझ्यासोबत घेऊन जाणार होतो, पण यासाठी तब्बल मी बरोबर दोन महिने विचार केला व नंतर मी स्वत:च जाण्यास सज्ज झालो, असे लिहिले आहे. यामुळे गर्भवती पत्नी आणि मुलीला मारुन मग आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात गेल्या दोन महिन्यांपासून घोळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी सांगितले की, हे सर्व २०१७ मधील प्रकरण असून त्याचवेळी सपकाळ यांच्या अर्जाची चौकशी करुन त्यांना ही दिवाणी बाब असल्याने आपण न्यायालयात जावे, अशी समज दिली असून त्या समजपत्रावर त्यांची सही सुद्धा आहे. स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता. त्यासाठी कर्ज काढले होते. त्या प्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता. त्याची चौकशी करुन ही दिवाणी बाब असल्याचे समजपत्र पोलिसांनी दिले होते. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी आपल्याला पैसे मिळवून द्यावेत, असे त्याचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबतची माहिती अशी, स्वप्नील सपकाळ हे गोंधळेनगर येथे रहात असून त्यांना एक मुलगी आहे. त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. रविवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी आपल्या घरांच्या भावनिक पत्र लिहिले असून त्यात त्याने सर्वांची माफी मागितली आहे. हे सर्व माझ्यामुळे झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. शेवटी त्याने तिघांची नावे लिहिली असून त्यांना सोडू नका असे म्हटले आहे.

दरम्यान, स्वप्नील सकपाळ याचे नातेवाईक पुण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.