भर चौकात तरुणाचा सपासप वार करून निर्घृण खून

मंगळवेढा/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भरचौकात अज्ञातांनी एका तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. सागर सुभाष वाघमोडे (वय-20 रा. मेटकरवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावात घडली.

सागर वाघमोडे हा खडकी गावातील खडकी चौकात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास थांबला होता. त्यावेळी अज्ञात तरुणाने सागर याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. परिसरातील एका व्यक्तीने हा खून केल्याचा संशय सागर वाघमोडेच्या नातेवाईकांनी केला आहे.

सागर वाघडमोडे याचे आई-वडील हे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी करण्यासाठी गेले आहेत. सागर हा त्याच्या आज्जीसोबत राहात होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केले असून खूनामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस खूनाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक कारणांमुळे किंवा इतर दुसऱ्या कारणामुळे त्याचा खून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.