नाशिकमध्ये युवकावर गोळीबार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वणी -सापुतारा येथे फिरायला आलेल्या युवकावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी एक युवक जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. निखिल कटारे (रा. गंगापूर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निखिल कटारे व त्याचे तीन मित्र सापुतारा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परत जात असताना सुरगाणा तालुक्यातील वताबारी गावाजवळ कटारे व त्याचे मित्र लघुशंकेसाठी खाली उतरले. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दौघांपैकी मागे बसलेल्याने आपल्याजवळील पिस्तुलातून गोळीबार केला. कटारे याच्या जबड्याला गोळी लागून तो जागीच कोसळला. गंभीर जखमी झालेल्या निखिल याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार टोळी युद्धातून घडल्याचे सांगितले जात आहे.

Visit : Policenama.com