स्टोक्सबद्दलच्या ट्विटवरून युवी-इरफानमध्ये रंगला ‘संवाद’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम | वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसर्‍या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली आहे. त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. स्टोक्सच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली. जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली.

यानंतर युवराज आणि इरफान यांच्यात ट्विटरवर मजेशीर संवाद रंगला. युवराजने इरफानला विचारले, ‘तुला काय वाटते की आपल्या संघाकडे असे अष्टपैलू खेळाडू नाहीत जे सामना जिंकवून देऊ शकतील.’ त्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘युवराज सिंग अधिकृतरित्या निवृत्त झाला आहे ना’ या कमेंटवर युवराजने पुन्हा रिप्लाय केला, ‘मला वाटलेच होते की हे सगळे माझ्यावर येणार. तसे बघितले तर तुम्ही पण काही कमी (प्रतिभावान) नव्हता.’ यावर इरफानने ‘तू तर मला चांगलाच ओळखतोस’, असा रिप्लाय देत ठोसा मारण्याचा इमोजी वापरला.