विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरु असलेले ’लेखणी बंद’ आंदोलन अद्यापही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  (Uday Samant) यांच्यासह अधिकार्‍यांसोबत बैठक होऊनही काल तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी गुरुवारपासून आंदोलन सुरु केले आहे.

केंद्र आणि राज्यशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गासह सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. तथापी राज्यातील 14 विद्यापीठ कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत. या संदर्भात राज्यशासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या.

मात्र सातव्या वेतन आयोगासह कर्मचार्‍यांची कालबद्ध पदोन्नती अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीची गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठक होऊन 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 1 ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी संपूर्ण काम बंद करुन संपात सहभागी होणार आहेत.