शरद पवारांच्या सभेनंतरच्या हाणामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांवर FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंदनवनातील सेवेनंतर माजी महापौर अभिषेक कळमकर यांना आमदार संग्राम जगताप समर्थकांनी मारहाण केली होती. मात्र पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कळमकर हे फिर्याद न देताच घरी परतले होते. कोणीही तक्रार दाखल न केल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर शहरातील नंदनवन लॉन येथे शनिवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या दोन गटात धक्काबुक्कीचा प्रकार घडला  होता. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कोतवाली विद्यमान आमदार संग्राम जगताप, शहराध्यक्ष माणिकराव विधाते तसेच काही नगरसेवकांनी येऊन अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची समजूत घातल्यानंतर  सर्वजण गुन्हा न नोंदवता  एकाच गाडीत बाहेर पडले होते.

मात्र रात्री उशीरा पोलीस कॉन्स्टेबल पवन लहारे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे संतोष लांडे, वैभव वाघ, बाबा गाडेकर, सुरेश बनसोडे, तोसिफ शेख, संतोष ढाकणे, जय लोखंडे व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून आपसात भांडण करून शिवीगाळ, दमदाटी करून पोलिसांसमोर झुंज केल्याबाबतचा गुन्हा नोंदवला आहे.
Visit :- policenama.com