… म्हणून PM मोदींनी मागितली जनतेची ‘माफी’, ‘मन की बात’मधील ‘या’ आहेत 10 खास ‘गोष्टी’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी अचानक घेतलेल्या लॉकडाऊनच्या कठोर निर्णयामुळे देशातील गरिबांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. तसेच कोरोना विरोधातील लढाई ही जीवन मरणाची लढाई असल्याचे सांगत मोदींनी लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही, असा सल्ला देशवासीयांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील 10 खास गोष्टी

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून देशवासियांना सांगितले की, लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

2. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास होत आहे, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. त्यांनी सांगितले की, या रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधीच त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

3. पंतप्रधान मोदी म्हणाले, हा विषाणू कोणत्याही राजकीय सिमांमध्ये बांधलेला नाही, तर कोणत्याही क्षेत्रापुरता मर्यादित नाही. हा विषाणू माणसाला मारून त्याला संपवण्याची जिद्दच घेऊन बसला आहे. त्यामुळे त्याला नष्ट करण्यासाठी संपूर्ण मानवजातीला एकत्र येण्याची गरज आहे.

4. नागरिकांनी येणारे काही दिवस धीर धरावा, तसेच आपल्याला लक्ष्मणरेषा आखून घ्यावी लागेल.

5. काही लोक अजूनही नियमांचे पालन करत नाहीत. त्यांना एवढेच सांगणे आहे की, लॉकडाऊनचे पालन नाही केले तर याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. कारण काही देशांनी गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.

6. या लढाईमध्ये पहिल्या रांगेत अनेक योद्धे आहेत खासकरून नर्सेस, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ ज्यांनी कोरोनाचा पराभव केला आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी करोनाशी लढून त्यातून बरं झालेल्या काही लोकांशी संवाद साधला. त्यांचे अनुभव ऐकून घेतले. तसेच काही तज्ज्ञ आणि डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला

7. यावेळी मोदींनी हैदराबाद येथील आयटी विशेष तज्ज्ञ रामगप्पा तेज यांच्याशी बातचीत केली. रामगप्पा यांनी मोदींना सांगितले की, क्वारंटाईनला लोकांनी जेल समजू नये. त्यांनी सांगितले की, आयटी सेक्टरच्या एका मिटींगसाठी मी दुबई येथे गेलो होतो. दुबईवरून भारतात परत आल्यानंतर ताप आला. हैदराबाद मधील एका रुग्णालयात कोरोनाची तपाणी केली त्यावेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. राम यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या देखरेखीखाली मी उपचार घेतले आणि 14 दिवसांनी मी बरा होऊन हॉस्पीटलमधून घरी आलो.

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींच्या अनुभवातून आपण शिकण्याची गरज असल्याचे आवाहन केले. तसेच राम यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचे पालन केले त्यामुळे त्यांना कोरोनाचा पराभव करणं शक्य झालं.

9. कोरोना विषाणूसोबत लढण्याच एकच प्रभावी उपाय आहे तो म्हणजे सामाजिक अंतर ठेवणे. सामाजिक अंतर ठेवणे म्हणजे सामाजिक सुसंवाद संपत नाही तर सामाजिक अंतर वाढवण्याची आणि भावनिक अंतर कमी करण्याची गरज आहे हे समजून घेतले पाहिजे. संकटाच्या या वेळेत गरीब आणि भुकेलेल्या लोकांना मदत केली पाहिजे, हे आपली संस्कार आणि संस्कृती असल्याचे मोदी यांनी सांगितले.

10. मोदी म्हणाले, पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा मन की बात मध्ये भेटू आणि तोपर्यंत आपण या संकटावर मात करण्यात यशस्वी झालेले असू.