जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवर 10 पाकिस्तानी सैनिकांचा ‘खात्मा’, चौक्या उद्ध्वस्त

श्रीनगर : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. तत्तापानी क्षेत्रात भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 10 जवान मारले गेले, तर काहीजण जखमी सुद्धा झाले आहेत. लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

एलओसीवर मंगवारी सकाळी सुमारे सात वाजता पाकिस्तानी लष्कराने पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटी, मनकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत लष्कराच्या चौक्यांसह रहिवाशी भागावर गोळीबार सुरू केला. मोर्टारचा मारा केला. पाकिस्तानी लष्कराच्या या नापाक कृतीला भारतीय लष्काराने तोडीसतोड उत्तर दिले. सुमारे तीन तास दोन्हीकडून गोळीबार सुरू होता.

गोळीबारात मनकोट क्षेत्राच्या अनेक घरांचे नुकसान झाले आणि काही नागरिक जखमी झाले. अचानक गोळीबार सुरू झाल्याने ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर तिकडे लष्कराने पाकिस्तानी लष्काच्या चौक्यांवर मोर्टारचा मारा केला, जेथून गोळीबार केला जात होता. पाकिस्तानी चौक्यांमधून धूराचे लोट निघत होते.

जुलैमध्ये एलओसीवर 47 वेळा गोळीबार
जुलैमध्ये पाकिस्तानने एलओसीवर पुंछ, राजौरी, कुपवाड़ा आणि बारामूला जिल्ह्यांत 47 वेळा सीजफायरचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी गोळीबाराबाबत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जेव्हापासून कलम 370 रद्द केले आहे, तेव्हापासून पाकिस्तानी लष्कराकडून सतत गोळीबार सुरू आहे. यामुळे आमचे जीवन कठिण झाले आहे.

श्रीनगर-बारामूला हायवेवर सैन्याचे वाहन उडवण्याचा कट अपयशी
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्या वर्धापन दिनाच्या एक दिवस अगोदर श्रीनगर-बारामूला हायवेवर लष्काराच्या वाहनांचा ताफा उडवण्याचा दहशतवद्यांचा कट लष्कराने उधळून लावला. मंगळवारी सकाळी तापर पट्टन भागात श्रीनगर-बारामूला राष्ट्रीय राज्यमार्गावर लष्कराच्या 29 राष्ट्रीय रायफल्सची रोड ओपनिंग पार्टीला गस्तीदरम्यान रस्त्याच्या कडेला आयईडी दिसले, जे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला करण्यासाठी ठेवले होते. सावध असलेल्या जवानांनी ताबडतोब बॉम्बविरोधीपकला माहिती देऊन ते निष्क्रिय केले.