धक्कादायक ! निरोगी झालेल्या 10 % लोकांना पुन्हा होतोय ‘कोरोना’, डॉक्टरही ‘हैराण’

बीजिंग : वृत्तसंस्था – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्र चीनमधील वुहानमध्ये आहे. वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं असून या व्हायरसमुळे चीनमध्ये 3 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना आता काही प्रमाणात चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. चीनमधील जवळपास 78 हजार लोकं निरोगी झाली आहेत. केवळ 5 हजार लोकं सध्या उपचार घेत आहेत. मात्र, कोरोनाचे केंद्र स्थान असलेल्या वुहानमध्ये सध्या धक्कादायक प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे डॉक्टर देखील हैराण झाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार निरोगी झालेल्या 10 टक्के रुग्णांना पुन्हा कोरोना झाला आहे. हे कसे घडले हे अद्याप कोणालाच समजू शकले नाही.

दक्षिण चीनमधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वुहानमधील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना कोरोना पुन्हा होत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, पुन्हा कोरोना होण्यामागचे कारण अद्याप शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना शोधता आलेले नाही. कदाचित कोरोनाला रोखण्यासाठी किंवा मारण्यासाठी जी औषधं वापरली जात आहेत, याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा हा व्हायरस विकसित होत असावा. त्यामुळे आता चीनसमोर वेगळेच आव्हान आहे.

वुहानमधील टोंगजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, या रुग्णालयात निरोगी व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुख्यत: याच रुग्णालयात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते, नवीन संसर्गाचे कारण शोधण्यात आले आहे आणि संक्रमित लोकांच्या कुटुंबाकडे चौकशी केली जात आहे.