‘शिवभोजन’ थाळी ‘सुसाट’, 11274 ‘गरजू’ आणि ‘गरीब’ लोकांनी घेतला ‘लाभ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला आज पासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये शुभारंभ करण्यात आला. आजच्या पहिल्या दिवशीच शिवभोजन थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवभोजनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 11 हजार 274 थाळींची विक्री झाली आहे. सध्या राज्यात 125 केंद्रावर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शुभारंभाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विक्री ठाणे, नाशिक भागात झाली आहे. गरीब आणि गरजूंसाठी फक्त 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात 1 हजार 350 थाळ्यांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेमुळे महिला किंवा महिलांच्या बचत गटांना काम मिळणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी 75 आणि जास्तीत जास्त 150 थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे.

प्रत्येक जिल्ह्यांसाठी 1 हजार 350 थाळ्यांचे लक्ष्य असताना नाशिकमध्ये 1 हजार तर ठाणे येथे 1 हजार 350 थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी 700 थाळ्यांची विक्री झाली. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून ही आकडेवारी प्रप्त झाली आहे.

दरम्यान, या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ राज्यातील शहरामध्ये आज झाला. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या शिवभोजन थाळीच्या योजनेला सुरुवात झाली. तर मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच ही योजना सुरु करण्यात आली असून यामध्ये काही त्रुटी असू शकतात. मात्र या त्रुटी लगेचच दूर केल्या जातील असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –