11 वीच्या ऑनलाईन प्रवेशाची तारीख जाहीर, ‘या’ वेबसाईटवर भरावा लागणार अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणी बारावीचे निकाल लांबले आहेत. तर राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आता 11 वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया 26 जुलैपासून सुरु होणार आहे.

दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नसतानाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. विभागीय शिक्षण उपसचालकांनी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेच्या कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ऑनलाइन प्रवेशासाठी https://mumbai.11thadmission.org.in हे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आले आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत विद्यार्थी आणि पालकांसाठी सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, प्रवेश अर्ज भरणे, माहिती गोळा करणे, प्रवेश अर्ज व्हेरीफाईड झाला याची खात्री करणे, यासाठी 26 जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या अर्जाची माहिती तपासून पाहण्यासाठी शाळांना 27 जुलैपासून मुदत
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर 24 जुलैपासून प्रयत्न करू शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी, शाळा ही प्रक्रिया ऑनलाईनच करणार आहेत, तसे आदेश देण्यात आले आहेत.