इजिप्त, इराणचा कांदा 13 टन पुण्यात आला, पण….

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कांद्याच्या दरात चढ उतार सुरू असताना इजिप्त, इराणचा कांदा 13 टन कांदा ( Onions imported from Egypt) शनिवारी (दि. 22) पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात दाखल झाला आहे. मात्र, पुण्यातील स्थानिक हॉटेलचालकांनी नोंदणी नोंदवली नाही. तसेच किरकोळ विक्रेत्यांनी केवळ तुरळक खरेदी केली आहे. तसेच दक्षिणेतील व्यापाऱ्यांनी या कांद्याची 1 टनापर्यंतची खरेदी केली आहे. त्यामुळे या कांद्याला तूर्तास फारशी पसंती नसल्याचे व्यापारी राजशेखर पाटील यांनी सांगितले.

इराणचा कांदा आकाराने मध्यम स्वरूपाचा आहे. त्याला मोड आले आहेत. तर भारतीय कांद्याच्या तुलनेत इजिप्तच्या कांद्याला फारशी चव नसल्याने त्याला मागणी नसल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदविले आहे. इजिप्त, इराणच्या कांद्याला एका किलोला रविवारी 35 रुपये दर मिळाला. दहा किलोला 350 ते 375 रुपये दर मिळाला आहे. तर इजिप्तच्या कांद्यापेक्षा स्थानिक भागातील जुन्या कांद्याला अधिक पसंती असून त्याला एका किलोसाठी 30 ते 50 रुपये दर मिळत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ – उतार दिसून येत आहेत. दिवाळीच्या सणात कांद्याचे दर भडकले होते. आता मात्र आवक वाढल्याने दर खाली येत आहेत.

विदेशी कांद्याला पुणेकरांची नापसंती
गेल्या आठवड्यात पुण्यात कांद्याचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे कांद्याचे घाऊक बाजारात 50 रुपयांपेक्षा अधिक दर होते. तर किरकोळ बाजारात 80 ते 90 रुपयांपर्यंत दर होते. मात्र जुन्या नव्या कांद्याची पुन्हा आवक झाल्याने तसेच मध्य प्रदेशातून नव्या कांद्याची जादा आवक झाल्याने गेल्या आठवड्यात दर उतरले होते. त्याच दरम्यान अफगाणिस्तानहून मुंबईमार्गे पुण्यात कांदा आला होता. त्या कांद्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली होती. कांद्याचा आकार मोठा असल्याने तसेच त्याला चव फारशी चांगली नसल्याने पुण्यातील हॉटेलचालकांनी या कांद्याला नापसंती दर्शविली होती व त्याकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर आतापुन्हा इजिप्त, इराण येथील कांद्याची आवक झाली. मात्र, त्या कांद्यालाही रविवारी फारशी मागणी नसल्याचे स्पष्ट झाले.