Coronavirus : दिल्लीतील ‘तबलिगी जमात’मध्ये महाराष्ट्रातील 1400 जणांची ‘हजेरी’, 1300 जणांना केलं ‘क्वारंटाइन’ : आरोग्यमंत्री

मुंबई : वृत्तसंस्था – दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या मेळाव्यास हजेरी लावलेले एकूण 1400 हुन अधिक जण महाराष्ट्रातील होते अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यापैकी 1300 लोकांना शोधण्यात आतापर्यंत यश आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त ए. एन. आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी माहिती दिली आहे की, “दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमात महाराष्ट्रातील 1400 हून अधिक लोकांनी हजेरी लावली. त्यापैकी जवळपास 1300 लोक आतापर्यंत सापडले आहेत आणि महाराष्ट्रात हे वेगळे केले जात आहेत. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने # COVID19 चाचणीसाठी गोळा केले जातील.

नक्की काय आहे प्रकरण

दरम्यान १८ मार्च रोजी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मशिदीत एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांतील लोक सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्वजण आपापल्या घऱी परतले. त्यापैकी काही जणांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील निरनिराळ्या भागातून या ठिकाणी लोक आल्यानं त्यांना युद्धपातळीवर शोधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यात सोलापुरातील १६ नागरिकांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील मिरज ,नागपूर ,पुणे ,सोलापूर ,कोल्हापूर या भागातील लोकांनी या मेळाव्यामध्ये घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्लीच्या मरकझमध्ये जाऊन आलेल्या राज्यातील सर्व लोकांचा शोध घ्या आणि त्यांची तपासणी करा, असे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात अशा लोकांचा शोध घेतला जात आहे.