17000 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावे, 6 जुलैपासून सुरूवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद होते. मिशन बिगिन अगेनमुळे उद्योग व्यवसाय एकीकडे सुरु होत असताना दुसरीकडे MMRDAच्या कंत्राटदारांच्या माध्यमातून 17 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी 6 जुलैपासून ऑनलाइन रोजगार मेळावे सुरु होणार आहेत. या 17 हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 2923 पदांची भरती होणार आहे.

या वेबसाईटवर रोजगार मेळावा
या पदांच्या भरतीसाठी ठाणे जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात 6 ते 8 जुलै या कालावधीमध्ये तर मुंबई शहर व उपनगर कार्यालयांसाठी 8 ते 12 जुलै या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचा हा रोजगार मेळावा होईल. हा मेळावा https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर होणार आहे.

या पदांसाठी होणार भरती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण कंत्राटदारांना गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार श्रमिक अशा 17 हजार कामगारांची आवश्यकता आहे.