मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेल्या अन् क्वॉरंटाईन झाल्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोल्हापूर जिल्ह्यात मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेलेल्या 19 महिलांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील कांचनवाडी या ठिकाणी घडली आहे. मैत्रिणीच्या पतीचे निधन झाल्यानंतर 19 महिला चाफोडी याठिकाणी सांत्वनासाठी गेल्या होत्या. मात्र ज्या मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी गेल्या त्या महिलेलाच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चाफोडी येथील महिला कांचनवाडी इथल्या महिलांसोबत होत्या. छोट्या-मोठ्या कामाबरोबर शेतीच्या कामानिमित्त या महिलांचा ग्रुप तयार झाला होता. एकमेकींच्या दुःखात या सहभागी होत. मात्र कोरोनामुळे सध्याची परिस्थिती वेगळी आहे. असे असताना देखील या महिला मैत्रिणीचे सांत्वन करण्यासाठी तिच्या घरी गेल्या. पण ज्या मैत्रिणीच्या सांत्वनासाठी गेल्या ती मैत्रिणच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने या सर्व महिलांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. अशातच क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेला धाप लागण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर महिलांही घाबरून गेल्या आहेत.