दारूच्या नशेत डंपर चालकानं तिघांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू तर तिसरा गंभीर जखमी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोअरपरळ येथे सोमवारी रात्री बावला मस्जिद समोर भीषण अपघात झाला. डंपरने तिघांना चिरडल्याने या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. एकजण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरु आहे.

डम्परचालक हा दारूच्या नशेत डंपर चालवत होता. नशेत असल्याने त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने रोड वरील गाड्यांना धडक द्यायला सुरुवात केली. या धडकेत एका टॅक्सीचे नुकसान झाले असून एका कारचा चक्काचूर झाला आहे.

नंतर डंपरवाला पळून जाताना त्याने रस्त्याने चालत असणाऱ्या तिघांना चिरडले, अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कल्याण येथे राहणारे संजय सखाराम पवार (वय ५९) यांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व्यक्तिची ओळख अद्याप पटली नसल्याचं पोलसांनी सांगितलं आहे.

डंपरने तिघांना चिरडले हे कळताच स्थानिकांनी मोनोरेल पुलाखाली गर्दी करण्यास सुरवात केली. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडीही झालेली होती. या अपघाताची माहिती कळताच शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले. पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

You might also like