‘कोरोना’मुळे कर संकलनात तब्बल 22.5 % घट !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन, 2,53,532.30 कोटी रुपये इतके झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन 22.5 टक्क्यांनी घटले आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे 15 सप्टेंबर 2019 अखेर सरकारच्या तिजोरीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांपोटी 3,27,320.20 कोटी रुपये जमा झाले होते. यंदा मात्र घट झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्ष करातील दोन मुख्य घटक म्हणजे, व्यक्तिगत तसेच कंपन्यांकडून प्राप्तिकराच्या 15 सप्टेंबरअखेपर्यंत जमा दोन हप्त्यातील अग्रिम कर आणि कंपनी कर हे आहेत. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे प्रमाण 1,47,004.60 कोटी रुपये, तर कंपन्यांचे प्राप्तिकर 99,126.20 कोटी रुपये असे आहे. वाढत्या कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत असलेल्या आणि परिणामी अर्थचक्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसलेल्या मुंबईचे देशाच्या कर महसुलात सर्वात मोठे (एकतृतीयांश) योगदान असते.

चालू वर्षांत 15 सप्टेंबपर्यंत येथून कर संकलन 74,789.60 कोटी रुपयांचे आहे, ज्यात वर्षांगणिक 13.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. मुंबईतून जमा करात, व्यक्तिगत प्राप्तिकर 34,808.80 कोटी आणि कंपनी कर 32,921.20 कोटी रुपये आहे. बेंगळूरु हे देशातील एकमेव केंद्र आहे ज्याने कर संकलनात वर्षांगणिक 9.9 टक्के वाढ नोंदविली आहे. 3,214.70 कोटींच्या कर संकलनासह कोची हे वर्षांगणिक 49 टक्के अशी सर्वाधिक घसरण नोंदवणारे केंद्र ठरले आहे.