Pune News : नागरिकांच्या पोलिसांविरोधात अनेक तक्रारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलिसांच्या विरोधात नागरिकांना तक्रार करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी राज्यात सहा ठिकाणी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची सुरुवात करण्यात आली. मात्र पुणे आणि नाशिक येथेच हे प्राधिकरण सुरु आहे. पुण्यात प्राधिकरणाची सुरुवात झाल्यानंतर 2020 मध्ये पोलिसांच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी 223 तक्रारी आल्या असून केवळ 16 निकाल लागले आहेत. उर्वरीत अर्जांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

पोलिसांकडून बेकायदा डांबून ठेवणे, कोठडीत छळ करणे, तक्रार न घेणे, धमकावणे, गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने न करणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या असतात. यामध्ये वरिष्ठांकडे तक्रार करुन देखील कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांना पोलिसांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी राज्यात पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक या सहा ठिकाणी पोलीस तक्रार प्राधिकरण तीन वर्षापूर्वी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

राज्यात सहा पैकी केवळ नाशिक आणि पुणे येथील प्राधिकरण सुरु झाली. पुण्यात प्राधिकरणाची सुरुवात झाल्यानंतर त्यांच्याकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्राधिकरणाकडे तक्रारी येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. पुण्यातील विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने अनेक पोलिसांच्या विरोधात निकाल देऊन त्यांच्यावर कारवाईच्या शिफारसी केल्या आहेत. त्यानुसार आयुक्तांनी संबंधित पोलिसांवर कारवाई केली.

पुण्यातील नांदेड सिटी फाटा परिसरात हे विभागीय तक्रार प्राधिकरण आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा आहेत, परंतु पदे रिक्त असल्याने न्यायासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने मिळवलेला विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. प्राधिकरणाने सदस्य व सचिवांसाठी अर्ज मागवले असून, त्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.