पुण्यातील जुन्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कोयते जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गुन्हा करण्यासाठी गुन्हेगारांकडून सर्रास कोयत्याचा वापर होताना दिसून येत आहे. पुण्यात या आठवड्यामध्ये कोयत्याने वार करुन खून केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काल रात्री कोयता गँगने सातारा रोडवर धुमाकूळ घातला. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जुन्या बाजारात धडक कारवाई करुन तब्बल २३२ कोयते, सत्तुर जप्त केले आहेत. तसेच कोयते विकणाऱ्या पाच जणांवर आर्म अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत.

जयसिंग शामराव पवार (24), निलेश तानाजी साळुंखे (38), दिनेश सुखलाल साळुंखे (40), फक्रुद्दीन जैनुद्दीन लोखंडवाला (42), कासीम नमुद्दीन छावणीवाला (42) यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, महेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सध्या शहरामध्ये गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले आहे. कोयत्याच्या धाकाने लुटमारी, खून, परिसरात दहशत पसरवणे अशा घटना दररोज घडत आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज पाच गुन्हे दाखल होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे कोयते मंगळवार पेठेतील जुन्या बाजारात १५० ते २५० रुपयांना मिळतात. महापालिकेकडून कोयता हे हत्यार शेतीअवजार असल्याने ते विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र आर्म अॅक्टनुसार ठराविक आकारापेक्षा मोठे कोयते विकण्यास बंदी आहे. तरी देखील असे कोयते सर्रासपणे विकले जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना दहशत निर्माण करण्यासाठी रविवारी आणि बुधवारच्या जुना बाजारात कोयते सहज उपलब्ध होत आहेत.

आर्म अ‍ॅक्टनुसार ठराविक आकारापेक्षा जास्त आकाराचे कोयते विक्री करता येत नाहीत. मंगळवार पेठेत असे मोठे कोयते विकणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 232 कोयते जप्त करून गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.