Coronavirus : राज्यात 24 तासात ‘कोरोना’चे 2487 नवे रुग्ण तर 89 जणांचा मृत्यू, 1248 रुग्ण झाले बरे

मुंबई : पोलीसनमा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 2487 नवीन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 1248 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 329 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 67 हजाराच्या वर गेली आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 2487 नवीन रुग्ण आढळून आले असून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67 हजार 655 इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 89 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 2286 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आज मृत्यू झालेल्या 89 रुग्णांमध्ये मुंबईत 52, नवी मुंबई 9, पुणे 9, मालेगाव 6, ठाणे 5, कल्याण-डोंबिवली 4, सोलापूर 2, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 46 पुरुष आणि 43 महिलांचा समावेश आहे. यात 60 वर्ष किंवा त्यावरी अधिक वयाचे 47 रुग्ण आहेत. 35 रुग्ण 40 ते 59 या वयोगटातील तर 7 रुग्ण 40 किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील आहेत. या 89 रुग्णांपैकी 56 रुग्णांमध्ये 63 टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. राज्यात सध्या 36 हजार 031 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.