भारतीय चलनाच्या नोटा पाहण्याच्या बहाण्याने दोघांना २५ हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गॅस डिलिवरी करणाऱ्या इराणी चलन दाखवून भारतीय चलनातील नोटा पाहण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत दोघांना चारचाकीतून आलेल्या तिघांनी हातचलाखी करून तब्बल २५ हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार कोथरुड येथे उघडकिस आला आहे. याप्रकऱणी तिघांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

तर विठ्ठल तुकाराम अडागळे(५५, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अडागळे व त्यांचे सहकारी बबन शिंदे हे दोघे गॅस एजन्सीमध्ये काम करतात. २७ जानेवारी रोजी ते दोघे पारिजात कॉलनी येथे असताना एक चारचाकी त्यांच्याजवळ येऊन थांबली. चारचाकीतील तिघांनी त्यांना जवळपास एखादे फाईव स्टार हॉटेल आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी दोघांनी त्यांना जवळच्या एका हॉटेलचा पत्ता सांगितला.

त्यानंतर तिघांनी त्यांना ईराणी चलनाच्या नोटा दाखवत त्या इथे चालतील का असे विचारल्यावर त्यांनी त्या चालणार नाहीत असे सांगितले. त्यानंतर भारतीय चलनातील नोटा कशा आहेत दाखवा असं दोघांना म्हणाले. त्यामुळे दोघांनीही आपल्याजवळ दिवसभरात गॅस डिलिव्हरी करून जमा झालेल्या रकमेतील १००, ५०० व २००० रुपयांच्या नोटा दाखविल्या. त्यावेळी आपल्याजवळचे सर्व पैसे त्यांच्या हातात दोघांनी दिले होते. त्यांनी पैसे पाहून परतही दिले आणि निघून गेले.

मात्र दोघांपैकी एकाला आपल्या बंडलमधील नोटा कमी आहेत अशी शंका आली. दोघांनी पैसे मोजून पाहिल्यावर मात्र अडागळे यांच्याकडील १५ हजार ५०० रुपये व बबन शिंदे यांच्याकडील ९ हजार ५०० रुपये अशी एकूण २५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी हातचलाखी करून काढून घेतली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोघांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जर्दे करत आहेत.