जन आरोग्य योजनेतून 25 हजार महिलांची प्रसुती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना कालावधीतही मुंबईत विविध सरकारी रुग्णालयात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’ तून पाच महिन्यात राज्यात 25 हजारांहून अधिक महिलांची सुरक्षित प्रसुती झाली आहे. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महापालिके सह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि आरोग्य विभागाच्या रुग्णालयांनी ताकद इतर ठिकाणी वापरावी लागली. त्यामुळे त्याचा फटका सामान्य रुग्ण तसेच गर्भवती महिलांना व डायलिसीसच्या रुग्णांना बसू लागला होता. त्यापार्श्वभूमीवर ‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून नायर व शीव रुग्णालयात गेल्या पाच महिन्यांत दीड हजारांहून अधिक प्रसुती झाल्या आहेत.

महिलांची ही अडचण लक्षात घेऊन ‘महात्मा फुले जनआरोग्य’ योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तातडीने गर्भवती महिलांकडे शिधापत्रिका कोणती आहे, याचा विचार न करता तात्काळ या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या योजनेत बाळंतपण तसेच अन्य आवश्यक चाचण्या- तपासण्यांसह 76 प्रकारचे उपचार करण्यास मान्यता दिली. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील रुग्णालयांच्या माध्यमातून प्रसुती तसेच आवश्यक त्या सर्व तपासणी व चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. योजनेत एक हजार रुग्णालये असून शंभरच्या आसपास रुग्णालयांमध्ये प्रसुतीची व्यवस्था होती. त्यामुळे गोरगरिबांना योजनेचा लाभ मिळाला आहे .