पुणे शहरातून आणखी तीन सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर पोलीस दलातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे आदेश काढले आहेत. सोमवारी (दि.२२) परिमंडळ -२ च्या हद्दीतून तिघांना तडीपार करण्यात आले होते.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अक्षय चिंतामणी निवंगुणे (वय-२३ रा. कामगारनगर, टेल्को कॉनली, कात्रज) याला तडीपार करण्यात आले आहे. तर स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संतोष विनायक नातु (वय-४० रा. महर्षिनगर, पुणे), अशोक हरिभाऊ भारस्कर (वय-३० रा. गुलटेकडी) या दोघांना तडीपार करण्यात आले आहे.

भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून तडीपार करण्यात आलेला आरोपी अक्षय चिंतामणी याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, पिस्टल बाळगणे, शस्त्रबंदीचे उल्लंघन करणे, धारदार शस्त्राने दुखापत करणे, संघटीत गुन्हेगारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या विनायक नातु याच्यावर मारहाण करणे, गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणे, संघटीत गुन्हेगारी, जबरदस्तीने रोकड पळवणे, दागिने लुटणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अशोक भारस्कर याच्यावर खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, दरोडा टाकून जखमी करणे, जबरदस्तीने रोकड पळवणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नोकरीच्या अमिषाने तरुणाची फसवणूक

पुणे :  भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा निगम (इएसआयसी) विभागात क्लार्कची नोकरी देण्याचे अमिष दाखवून १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान एफ.सी. रोडवरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अर्जुन देवकर (वय-२३ रा. ता. माण, जि. सातारा) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने अर्जुन देवकर याला इएसआयसीमध्ये पब्लिक रिलेशन ऑफीसर व क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी महिलेने फिर्यादी अर्जुन याच्याकडून १ लाख ५ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी न लावल्याने अर्जुन याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महिलेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

जाहिरात