आई, बहिणीच्या मदतीने तिने पतीला संपविले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेने आई आणि बहिणीच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली आहे. पती वारंवार त्रास देत असल्यानेच हा खून केला आहे. ही घटना ट्रॉम्बे येथे गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. रहिम दिलावर खान (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खून करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चिता कॅम्पमधील जी सेक्टरमध्ये रहिम खान पत्नी व दोन मुलींसोबत राहत होता. त्याची पत्नी सलमा, सासू बिलकिश शेख आणि मेव्हणी ताजुनिया हसिना यांनी गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास रहिमचे तोंड दाबून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर जड वस्तूने घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर, रहिमचा मृत्यू झाला हे कोणाला कळू नये यासाठी तिघींनी दफन करण्याची तयारीही केली होती.

मात्र, परिसरातील रहिवाशांना याबाबत भनक लागताच त्यांनी रहिमच्या नातेवाईकांना कळविले. दरम्यान नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना याबाबत सांगून रहिमचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. त्यावेळी रहिमच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या तसेच मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला, त्यावेळी रहिमच्या १२ वर्षांच्या मुलीने आई, आजी आणि मावशीने पप्पाला मारल्याचे सांगितले. दरम्यान, याप्ररकणी कलम ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करून ट्रॉम्बे पोलिसांनी सलमा, बिलकिश आणि ताजुनिया या तिघींना अटक केली आहे.

You might also like