गाळपासाठी 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची कर्ज’हमी’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 32 साखर कारखान्यांना येत्या गळीत हंगामासाठी 391 कोटींच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कारखान्यांना कर्ज देणार्‍या बँकाना गाळप सुरू होताच साखरेच्या प्रती पोते 250 रूपये टॅकींग करून कर्ज वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात यंदा 10.66 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक आहे. त्यामुळे गळीत हंगामासाठी 815 लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कारखान्यांची संख्या विचारात घेता 615 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप होऊ शकेल, तर 200 लाख मेट्रीक टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यातच आर्थिक अडचणीमुळे 32 कारखाने यंदाच्या हंगामात बंदच राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळे या कारखान्यांच्या क्षेत्रातील 170 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाअभावी शिल्लक राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या ऊसाचे गाळप झाले नाही तर शेतकर्‍याना नुकसान भरपाईपोटी 4 हजार 800 कोटी रूपये देण्याचा भुर्दंड सरकारला सोसावा लागला असता. त्यामुळे अडचणीतील कारखान्यांना यंदा अल्पमुदत कर्जासाठी शासन हमी देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुसार आर्थिक अडचणीतील 31 सहकारी साखर कारखान्यांना 391 कोटींच्या अल्पमुदत कर्जाला विनाअट थकहमी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.