Coronavirus : देशात 24 तासांत 4 जणांचा मृत्यू तर 92 नवे रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना व्हायरसचा प्रतिबंध घालण्यासाठी सचिवांकडून कोणती पावली उचलण्यात येणार आहेत, यावर आज (सोमवार) आरोग्य आणि गृह मंत्रालयाची संयुक्त बैठक झाली. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या 24 तासामध्ये कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधित 92 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात एकूण 1071 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून भारतातील मृतांची संख्या 29 झाली आहे.


लव अग्रवाल म्हणाले की, पूर्वोत्तर प्रदेशाच्या विकास मंत्रालयाने देशाच्या ईशान्य भागात वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन वस्तूंच्या पुरवठ्यासाठी विशेष मालवाहू उड्डाणे चालवण्यास परवानगी दिली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रमन गंगा केतकर म्हणाले की, देशात आतापर्यंत 38 हजार 442 जणांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 501 जणांची चाचणी काल घेण्यात आली. याचा अर्थ असा आहे की आपली सध्याची चाचणी करण्याची क्षमता 30 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. मागील तीन दिवसांमध्ये 13 हजार 034 लोकांची खासगी लॅबमध्ये चाचणी घेण्यात आली होती.