पुण्यात लागलेल्या भीषण आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांच्या भितीने दुकानाला बाहेरुन कुलूप लावण्याचा प्रकार आज ५ कामगारांच्या जीवावर बेतला. देवाची उरुळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला पहाटे आग लागली. या आगीत दुकानाला बाहेरुन कुलूप लावले असल्याने आतील ५ कामगारांचा धुराने गुदमरुन आणि होरपळून मृत्यु झाला. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली.

सासवड रोडवरील देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटर आहे. या दुकानातील ५ कामगार दुकानात झोपले होते. दुकानाला बाहेरुन कुलूप लावण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे दुकानाला आग लागली. पण दुकानाला बाहेरुन कुलूप लावले असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यांनी मॅनेजरला फोन करुन आगीची माहिती दिली. पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. तातडीने ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. सुमारे तास भराच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली.

दुकानात कपडे व अन्य साहित्य असल्याने आग वेगाने पेटली. कामगारांना बाहेर पडता आले नाही. आतच त्यांचा मृत्यु झाला.

आग विझविल्यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी सकाळी पावणे सातच्या सुमारास दुकानातून चार जणांचे मृतदेह बाहेर काढले. पाचव्या कामगाराला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर आणण्यात आले. त्याला तातडीने उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येते.

You might also like