हिंजवडीमध्ये कारच्या धडकेत ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन

घरासमोर खेळत असलेल्या ५ वर्षाच्या मुलाला भरधाव कारने ठोकरल्याने गंभीर जखमी होऊन मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास ग्रामपंचायत ऑफिसजवळ झाला. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

संघर्ष संदिप मोरे (वय-५) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. सोमनाथ राक्षे (रा. सांगावडे, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सघर्षचे वडिल संदिप मोरे (वय-२६ रा. जांभेगाव, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी संघर्ष घराबाहेर खेळत होता. त्यावेळी आरोपी राक्षे हा भरधाव वेगात जात होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारची धडक खेळत असलेल्या संघर्षला बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. कारचालक राक्षे विरुद्ध हिंडवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उप निरीक्षक नंदराज गभाले हे तपास करीत आहेत